भामरागड हा तालुका गडचिरोली मुख्यालयापासून 170 कि.मी. अंतरावर असून भामरागड तालुक्याची निर्मिती 01 मार्च 1997 ला झालेली आहे. तसेच पंचायत समिती भामरागड कार्यालयाची स्थापना दिनांक 14/ 03/ 1997 ला झालेली आहे.
भामरागड हे ठिकाण इंद्रावती, गोदावरी नदीची उपनदी पर्लकोटा आणि पामुलगौतम या तीन नद्यांच्या संगमाच्या उजव्या तीरावर वसलेले असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सिमेवर स्थित आहे. येथील बहुतांश लोक आदिवासी जमातीची असून यात प्रामुख्याने माडीया, गोंड या जातीचा समावेश आहे. येथील बहुतांश लोक व्यवहारामध्ये माडीया, गोंडी, मराठी या बोलीभाषेचा वापर करतात.
संपूर्ण तालुका हा डोंगराळ, दुर्गम आणि अति घनदाट जंगलाव्दारे व्याप्त असून या प्रदेशाला दंडकारण्य प्रदेश म्हणूनही संबोधले जाते. तालुक्यामधील उच्च प्रतीचे बांबू व तेंदू प्रसिध्द असून त्याची निर्यात लगतच्या राज्यामध्ये व महाराष्ट्राच्या इतर जिल्हयामध्ये केली जाते. तालुक्याअंतर्गत एकूण 19 गट ग्रामपंचायती असून एकूण 138 महसूली गावे आहेत.
भामरागड तालुक्याच्या अगदी जवळ हेमलकसा येथे जगप्रसिद्ध लोक बिरादरी प्रकल्प आहे. या प्रकल्पाची स्थापना सन 1973 मध्ये पद्मविभूषण बाबा आमटे यांनी केली होती. त्यांचे पुत्र पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाचा विस्तार केला व सध्यास्थितीत या प्रकल्पाचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे पुत्र डॉ. दिगंत आमटे हे आहेत. सदर प्रकल्पाअंतर्गत विविध प्रकारच्या वैद्यकीय तथा शैक्षणिक सेवा पुरविल्या जातात. या प्रकल्पामधील ॲनिमल ऑर्क प्रसिद्ध असून यामध्ये विभिन्न प्रकारच्या अनाथ प्राण्यांचे संगोपन केले जाते.
तालुक्यापासून 36 कि.मी. अंतरावर बिनागुंडा हे गाव असून तेथे बारमाही वाहणारा धबधबा आहे. तसेच तालुक्यापासून 15 कि.मी. अंतरावर दोबूर येथे सुद्धा धबधबा आहे.
पंचायत समिती भामरागड येथील प्रमुख हे राज्य शासनाचा वर्ग -1 अधिकारी असून त्यांचे पद गट विकास अधिकारी आहे. याशिवाय वर्ग – 2 अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून काम करतात. याशिवाय पंचायत समिती स्तरावर विविध विभाग असून सर्व विभागामध्ये प्रशासकीय कामे केली जातात.